www.gaudbrahmansabha.org
या संकेतस्थळावर सर्व आद्य गौड ब्राह्मण ज्ञातीबांधवांचे खूप खूप विनम्र स्वागत!
सन १८९७ मध्ये गौड ब्राह्मण सभेची स्थापना झाली. ‘कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण ज्ञातीबांधवांची सर्वांगीण उन्नती आणि विकास’ हे मुख्य उद्दिष्ट मानून सभेची अखंड वाटचाल चालू आहे. सभेची विविध ध्येयं-धोरणे, उपक्रम याबाबत सभेच्यावतीने प्रकाशित केल्या जाणाऱ्या “गौड ब्राह्मण” या मुखपत्रामधून याची साक्ष मिळते.
हे संकेतस्थळ म्हणजे सभेने नव्या-जुन्या विचारांची सांगड घालून आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये ठेवलेले हे पुढचे पाऊल आहे. माहितीच्या महाजालात स्वत:चे असे विशेष स्थान निर्माण करणे, आपल्या पूर्वजांनी दिलेले विचार आणि संस्कार नव्या पिढीपर्यंत डोळसपणे पोहोचवणे; तसेच कामानिमित्त आपला देश, आपले मूळ गाव सोडून दूरवर जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या ज्ञातिबांधवांना एकत्र आणणे, त्याद्वारे माहिती आणि संस्कृतीची देवाणघेवाण करण्यासाठी आपुलकीचे व पारदर्शी व्यासपीठ मिळवून देणे व त्यानुसार विकास साधणे ही या संकेतस्थळामागील प्रमुख उद्दिष्टे आहेत.
आपण नियमितपणे या संकेतस्थळास दिलेली भेट व त्यासंदर्भात आपल्या मौलिक प्रतिक्रिया सभेला तिच्या निश्चित ध्येयपूर्तीच्या वाटचालीसाठी स्फूर्तिदायक आणि मार्गदर्शक ठरतील हे निश्चित!
चला तर मग, सभेच्या या संकेतस्थळाद्वारे “गौड ब्राह्मण ज्ञाती” आणि “गौड ब्राह्मण सभा” याविषयी जाणून घेऊया.
धन्यवाद !!!
गौड ब्राह्मण सभा
संस्थेच्या घटना व नियमावलीनुसार संस्थेची ध्येयं आणि उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.
(संदर्भ: गौड ब्राह्मण सभेची घटना व नियमावली)
कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण ज्ञातीची सर्वांगीण उन्नती करणे.
गौड ब्राह्मण ज्ञातीबांधवांत बंधुत्व, एकता व विश्वास निर्माण करणे.
सभा, स्नेह-संमेलने भरविणे, ज्ञातीतील वधू-वरांसाठी वधू-वर मेळावा, क्रीडामहोत्सव आदि उपक्रम आयोजित करून ज्ञातीबांधवांचा उत्कर्ष साधणे. तसेच ज्ञातीतील ७० वर्षांवरील गरीब स्त्री/पुरुषांना, निराधार, निराश्रित, गरीब, गरजू स्त्री/पुरुषांना, ज्ञातीतील कर्करोगग्रस्तांना तसेच इतर व्याधीग्रस्त रुग्णांना औषधोपचारासाठी आर्थिक साहाय्य करणे, तसेच ज्ञातीतील हुशार, होतकरू, निराधार, निराश्रित, गरीब मुलांना शिष्यवृत्ती (आर्थिक साहाय्य) देणे.
नियतकालिक प्रकाशित करणे, वाचनालय चालविणे, गौड ब्राह्मण ज्ञातीविषयक दुर्मीळ ग्रंथांचे जतन करणे व याद्वारे ज्ञातीबांधवांना ज्ञातीसंबंधी माहिती पुरवणे.
सभेच्या घटना क्र. १३, १५ आणि ५५ अन्वये निवृत्तीमुळे रिकाम्या होणाऱ्या जागा निवडणूक घेऊन भरणे आहे. या जागांसाठी जास्त उमेदवारी अर्ज आल्यास वार्षिक सभेत निवडणूक घेतली जाईल. निवडणूक अधिसूचना वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. अधिक माहितीसाठी सभेच्या कार्यालयात संपर्क साधा.
गौड ब्राह्मण सभा, प्रतिवर्षी ज्ञातीतील बटूंसाठी सामुदायिक मौजीबंधनाचा सोहळा आयोजित करीत असते. यंदा हा सोहळा रविवार दिनांक ६ मे २०१८ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत गिरगाव येथील कुडाळदेशकर गौड ब्राह्मण निवासातील टोपीवाला वाचनालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. दाभोली मठातून पौरोहित्याचे शिक्षण घेतलेल्या श्री. सुरेंद्र भट यांच्या मार्गदर्शनाखाली वेदमंत्रांच्या घोषात अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने ज्ञातीतील ५ बटूंवर विधिवत उपनयन संस्कार करण्यात आले.
या मौजीबंधनाच्या सोहळ्यास बटूंचे नातेवाईक, संस्थेचे पदाधिकारी, कार्यकारी मंडळाचे सदस्य, ज्ञातीतील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
१२ जानेवारी हा दिवस ‘स्वामी विवेकानंद जयंती’ तसेच ‘राष्ट्रीय युवादिन’ म्हणून देशात सर्वत्र साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून ‘गौड ब्राह्मण ज्ञातीतील युवापिढीने कला-क्रीडेच्या माध्यमातूनदेखील एकत्र येऊन ज्ञातीच्या विकासाला हातभार लावावा’ ह्या हेतूने सन २०१६ पासून गौड ब्राह्मण सभेतर्फे “कुडाळदेशकर गौड ब्राह्मण प्रीमियर लीग” क्रीडामहोत्सवाची संकल्पना राबवली जाते.
यंदा ‘गौड ब्राह्मण सभा’ संकल्पित, ‘कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली’ या संस्थेतर्फे आयोजित पाचव्या ‘कुडाळदेशकर प्रीमियर लीग” क्रीडामहोत्सवाचे (२०२०) आयोजन दि. ११, १२ जानेवारी २०२० रोजी डोंबिवली येथील जिमखाना ग्राउंडवर करण्यात आले होते.
या सोहळ्याची काही क्षणचित्रे वेबसाईटच्या Gallery – Events Gallery या मेन्यूमध्ये पाहता येतील.
तसेच स्व. श्री. गुं. फ. आजगावकर जन्मशताब्दीनिमित्त (२०१९) गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा : गौड ब्राह्मण सभेचे १२२ वे वार्षिक स्नेह-संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा बुधवार दि. २५ डिसेंबर रोजी दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिराच्या सभागृहात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या वार्षिकोत्सवाचे आणखी एक खास वैशिट्य म्हणजे आपल्या ज्ञातीतील एक बहुआयामी, अष्टपैलू व्यक्तीमत्त्व, साहित्यिक, कवी, इतिहाससंशोधक, निर्भीड पत्रकार, शिक्षक स्व. श्री. गुं. फ. आजगावकर यांच्या जन्मशताब्दीचे (२०१९) औचित्य साधून गौड ब्राह्मण सभा व आजगावकर कुटुंबियांच्या संयुक्त विद्यमाने, गौड ब्राह्मण त्रैमासिकाच्या ‘स्व. श्री. गुं. फ. आजगावकर गौरवग्रंथा’चे प्रकाशन, वेबसाईट तसेच ‘गुं. फ.’च्या कारकीर्दीवर आधारित रंगीत माहितीपटाचे प्रसारण ज्ञातीतील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर कार्यक्रमाची काही क्षणचित्रे वेबसाईटच्या Gallery – Events Gallery या मेन्यूमध्ये पाहता येतील.
गौड ब्राह्मण ज्ञातीचा शेकडो वर्षांचा इतिहास पाहता वेळोवेळी या संदर्भात लेखन, चित्रण झाल्याचे दिसून येते. ही ग्रंथसंपदा आपल्या वैभवशाली आणि स्फूर्तिदायक परंपरेची साक्ष देते. आपल्या पूर्वजांनी दिलेला हा वारसा, अमूल्य ठेवा सांभाळणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे.
गौड ब्राह्मण सभेने अशा मौल्यवान ग्रंथ संपदेचे जतन आणि संवर्धन करून हा ठेवा ज्ञातिबांधवांना उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला असून या उपक्रमासाठी ज्ञातीबांधवांकडून बहुमोल ग्रंथ भेटीदाखल स्वीकारले जातात.