कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण ज्ञातीविषयी

कोSSS हम ...? मी कोण आहे...? माझे मूळ कोणते..? माझे वाडवडील कोण होते, कुठे होते...? आपली कुलदेवता कोणती? यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात सतत घर करून असतात. आपल्या अस्तित्वासाठी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण शोधत असतो. हा तर मानवी स्वभावच आहे.

ज्ञातीचा पूर्वेतिहास:

कुडाळदेशकर ज्ञातीला शेकडो वर्षांचा सलग इतिहास आणि परंपरा लाभली आहे. वेळोवेळी घडलेल्या भौगोलिक, धार्मिक, सामाजिक, आणि राजकीय स्थित्यंतरांचा हा समाज साक्षीदार आहे. याबाबत बरेच संशोधन आणि लिखाण ग्रंथरूपाने उपलब्ध आहे. त्याचाच हा सारांश....
‘कुडाळदेशकर गौड ब्राह्मण’ ही जाती नव्हे तर ज्ञाती आहे. जाती हा शब्द ‘उत्पत्ती’ दर्शवतो तर ज्ञाती हा शब्द ‘विशिष्ट योग्यता’ दर्शवतो. म्हणूनच ‘जायते इति जाति:’ जी उत्पन्न होते ती जाती व ‘ज्ञायते इति ज्ञाति:’ जी विशिष्ट (गुणांमुळे) ओळखली जाते ती ज्ञाती होय.
मूळ इतिहासाच्या संदर्भात ज्ञातीचा विचार करावयाचा झाल्यास गौड ब्राह्मण या शब्दाची व्युत्पत्ती “गुड” (GUD) या शब्दापासून झाली आहे. “उत्तर कुरु”मधील “गुड” या प्रांतात राहणारे ते “गौड ब्राह्मण” या नावाने ओळखले जायचे. कुडाळदेशकर ब्राह्मण हे परंपरेने स्वत:ला “गौड” किंवा “आद्य गौड” म्हणवितात.
‘कुडाळदेशकर गौड ब्राह्मण हा समाज मूळचा बंगालमधील “गौड बंगाल” प्रांतातला. इ. स. अकराव्या शतकाच्या आरंभी उत्तरेकडे गंगाकिनारी “मुंज” नामक भूप्रदेशावर आद्य गौड ब्राह्मण ज्ञातीचा “देवशर्मा” नावाचा राजा राज्य करत होता. “गौड” म्हणजे रक्षण करणारा, तर “ब्राह्मण” म्हणजे ब्रह्म म्हणजे वेदशास्त्र जाणणारा... असा हा देवशर्मा राजा.....!!! गझनीच्या महम्मुदाने केलेल्या स्वारीत मुंज संस्थानाची वाताहात झाली आणि राजा देवशर्मास आपल्या ज्ञातीबांधवांसहित गंगेच्या काठाकाठाने स्थलांतर करावे लागले.
‘भात, शेती व मासे’ हे मुख्य अन्न असलेला आद्य गौड ब्राह्मण हा समाज मजल दर मजल करीत पूर्वेस बंगाल प्रांतात कलकत्त्यानजिक किनारपट्टीच्या प्रदेशात स्थिरावला. तदनंतर त्यांपैकी काहीजण पश्चिमेकडे सह्याद्री पर्वत ओलांडून पश्चिम किनारपट्टीवर परशुरामाने पावन केलेल्या कोकणभूमीत मोठ्या संख्येने स्थिरावले.
त्यावेळेस कोकणचे राज्यकर्ते असलेल्या कदम्ब राजाने त्यांना कुडाळप्रांतीचे मांडलिकी अधिकार दिल्याने दक्षिण कोकणातील सर्व आद्य गौड ब्राह्मणांना “कुडाळदेशस्थ (कुडाळदेशकर) आद्य गौड ब्राह्मण” असे संबोधले जाऊ लागले.
पुढे सतराव्या शतकाअखेरीस कुडाळदेशीचे आद्य गौड ब्राह्मणाचे राज्य संपुष्टात आल्यावर कित्येक कुटुंबांनी खाली गोवा, उडिपी, बेळगाव, कारवार तर वर वसई, अर्नाळयाकडे स्थलांतर केले. मात्र या सर्वांनीच आद्य गौड ब्राह्मण या ज्ञातीया निष्ठा “कुडाळदेशकर” या बिरुदावलीसह कायम ठेवल्या. ‘मालवणी’ या आपल्या मूळ बोलीभाषेला त्यांनी आजतागायत जिवंत ठेवलेच पण समृद्धही केले आहे.
मुळच्या यजुर्वेदी असलेल्या कुडाळदेशकरांनी कऱ्हाडे ब्राह्मणांच्या संपर्कात येऊन स्वत:ला ‘ऋग्वेदी’ म्हणून सिद्ध केले आणि यातून अत्रि, भारद्वाज, धनंजय, गर्ग्य, गौतम, जमदग्नी, काश्यप, कौंडिण्य, सांख्यायन, वशिष्ट आणि वत्स ही कुडाळदेशकर गौड ब्राह्मणांची प्रमुख गोत्रे ठरली.
कुडाळ प्रांतातील त्यांचा समग्र इतिहास पाहता, पौरोहित्य हा त्यांचा व्यवसाय नसून ग्रामव्यवस्था व राजव्यवस्था आणि पर्यायाने राजकारण आणि कृषी हे त्यांचे व्यवसाय दिसतात.

धर्मसत्ता आणि आध्यात्म:

धर्मसत्ता ही कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मणांची प्रभावी सत्ता होती जिथे राजेशाही झुकली; कारण धर्म म्हणजे ‘आध्यात्म’ आणि ‘योग सामर्थ्य’, जेथे सर्वांनाच लीन व्हावे लागते. वसई प्रांतातील ‘निर्मळ’ या गावातील मठ, कुडाळ प्रांतातील सोनवडे मठ, गोळवण मठ, चिंदर मठ, हरीचरणगिरी मठ अशी स्थित्यंतरे घडत आज आपली धर्मपरंपरा “श्रीमठ दाभोली” येथे स्थिरावली आहे.
याच कुडाळदेशकर बांधवांनी आद्य जगद्गुरू श्रीमत् शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार केला आणि त्यातून १७४५ मध्ये कुडाळ प्रांतातील ‘दाभोली’ येथे ज्ञातीचा मठ स्थापन झाला; पहिले मठाधिपती होते - श्रीमत् पूर्णानंद स्वामी!
आज हा मठ आद्य गौड ब्राह्मण ज्ञातीचे हक्काचे आणि सामर्थ्याचे धर्मपीठ आहे. आद्यगुरु श्रीमत् पूर्णानंद स्वामी हे ज्ञातीचे केवळ धर्मगुरू नव्हेत तर ते एक चिरंतन शक्ती आहेत. संत ज्ञानेश्वरांप्रमाणे शके १६८५ चैत्र वद्य चतुर्थीला संजीवन समाधीस्थ श्रीमत् पूर्णानंद स्वामी हे गौड ब्राह्मण ज्ञातीच्या भाग्याला लाभलेले दिव्य तेज आहे.
आजगाव येथील प्रभू मतकरी घराण्यातील शिष्य श्री रुद्राजीपंत यांना श्रीमत् पूर्णानंद स्वामींनी दीक्षा दिली आणि त्यांचे नाव चिदानंद ठेविले. श्री चिदानंदांनंतर श्री मठ दाभोलीमध्ये सतरा स्वामी होऊन गेले. धार्मिक परंपरेनुसार महाशिवरात्री, श्रीराम नवमी, श्रीदत्त जयंती, श्रीमत् पूर्णानंद स्वामी महापुण्यतिथी आदि उत्सव तसेच वेदपाठशाळा, गोशाळा, नित्य उपासना पूजा विधी, नामस्मरण आदि उपक्रम मठामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात राबवले जातात.
श्रीमठ दाभोली हा कुडाळदेशकर गौड ब्राह्मण ज्ञातीचा एक दिव्य ठेवा आहे.

भक्ती आणि विरक्ती:

ईश्वरी उपासना हा ज्ञातीचा स्थायीभाव! घराघरातील दैनंदिन पूजा-अर्चा आणि देवधर्मासोबत आपल्या कुलदेवतेला आणि ग्रामदेवतेला भजणे नित्याचे आहे.
जगद्गुरू श्रीमत् शंकराचार्य (शृंगेरी मठ) हे कुडाळदेशकरांचे आद्यगुरु आणि त्यांच्या कृपेने काही मुख्य देवस्थाने स्थापन झाली ती म्हणजे वालावलचे श्रीदेव लक्ष्मीनारायण, नेरुरचे श्रीदेव कलेश्वर, धामापूरची श्रीदेवी भगवती, परुळ्याचे श्रीदेव आदिनारायण आणि ‘पाटा’चे श्रीदेव गणेश आणि श्रीदेवी माऊली, दाभोलीचा श्रीदेव गौतमेश्वर-नारायण ही होय! त्यानुसार विविध अग्रहारातील लोकांनी आपली कुलदैवते वेगवेगळी मानली ती पुढीलप्रमाणे – श्रीदेव लक्ष्मीनारायण, श्रीदेव कलेश्वर, श्रीदेवी भगवती, श्रीदेव आदिनारायण, श्रीदेव वेतोबा, श्रीदेव रवळनाथ, श्रीदेव महादेव, श्रीदेव पुरुषोत्तम, श्रीदेवी सातेरी, श्रीदेवी भद्रकाली, श्रीदेवी शांतादुर्गा, श्रीदेवी माऊली देवी, श्रीदेवी सड्यावरची माऊली, श्रीदेवी तारादेवी, श्रीदेवी चामुंडेश्वरी, श्रीदेवी भवाई, श्रीदेव गणेश, श्रीदेव गौतमेश्वर-नारायण!
मूळ वृत्ती धार्मिक व आध्यात्मिक असेल तर विरक्ती ही आलीच. आपली ज्ञातीही त्यास अपवाद नाही. आपल्या ज्ञातीला एक महान संतपरंपरा लाभली आहे. ज्ञातीतील अनेक संत मंडळींनी भक्तीचा व उपासनेचा मार्ग दाखवून ज्ञातीला एक बळकट आध्यात्मिक अधिष्ठान दिले आहे. या अनेक ज्ञात-अज्ञात संतगुरूंना आमचे शत शत नमन !!!!!

स्त्रीशक्ती:

आजवर वेळोवेळी घडलेल्या स्थित्यंतरामध्ये कुडाळदेशस्थांची पूर्वापार संपन्न सांस्कृतिक परंपरा अखंड अबाधित ठेवण्याचे कार्य ज्ञातीतील सुविद्य व सुशील महिलावर्गाने केले. काळाची पाऊले ओळखून त्यांनी शिक्षण आणि संस्काराचे महत्त्व जाणले. त्यामुळे सुशील, सद्वर्तनी, महत्त्वाकांक्षी पुरुषांच्या कितीतरी पिढ्या त्या घडवू शकल्या.

युवाशक्ती:

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या देशात सामाजिक स्थित्यंतरे फार झपाट्याने होत गेली.
ज्ञातीच्या भावी आणि तरुण पिढीचे धोरण सर्व समावेशक आहे. “हे विश्वची माझे घर” अशा स्थिर दृष्टीकोनातून ही पिढी जगाकडे पाहते. इतर समाजाप्रमाणे आधुनिक विचारसरणीचा स्वीकार करताना त्यांना स्वतःच्या कर्तव्यांची आणि जबाबदा-यांची चांगलीच जाण आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची आणि नव्या युगाची आव्हाने पेलण्यास ही पिढी निश्चितच सक्षम आहे.