गौड ब्राह्मण सभेविषयी

गौड ब्राह्मण ज्ञातीबांधवांना सर्वतोपरी साहाय्य करण्याच्या आंतरिक प्रेरणेपोटी, स्व:ताचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच स्वत:च्या तन, मन, धनाचे खतपाणी घालून गेल्या १२२ वर्षांच्या मशागतीने ज्या माजी व विद्यमान समाजपुरुषांनी “गौड ब्राह्मण सभा” हा समाजवृक्ष निर्माण केला, त्या समाज धुरंधरांना आमचे शतश: प्रणाम!
गौड ब्राह्मण ज्ञातीबांधवांचे हित जोपासणे या प्रेरणेने सुरू झालेल्या गौड ब्राह्मण सभेला १२० वर्षांचा देदीप्यमान कालखंड लाभला आहे हे विशेष! या प्रदीर्घ कालखंडातील तिच्या उत्क्रांतीचा इतिहास हा अनेक व्यक्तींशी, इतर स्वजातीय संस्थांशी तसेच वेळोवेळीच्या सामाजिक परिस्थितीशी निगडीत आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वसंध्येला कोकणातील आपल्या काही पूर्वसूरींनी कनवटीला बारा-आठ आणे अडकवून आपले भवितव्य घडवण्यासाठी जिद्द आणि अथक परिश्रमांची शिदोरी बरोबर घेऊन प्रथम मुंबईत पाऊल ठेवले. थोडे स्थिरस्थावर झाल्यावर एकमेकांशी संपर्क साधला. कोकणातील इतर ज्ञातीबांधवांना मुंबईत येण्याचे आवतरण दिलेच तसेच जमेल तसे आलेल्यांना शिक्षणाची, निवासाची तसेच नोकरीचीही सोय उपलब्ध करून दिली. पाहता पाहता कर्तृत्वाने कळस गाठला. जसजसा ज्ञातीबांधवांचा ओघ वाढू लागला, तसतसे एकत्र भेटणे, चर्चा-मसलत, विचार-विनिमयास गती प्राप्त झाली.
त्यानंतर आपल्या ज्ञातीतील पूर्वसूरींनी, स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून ज्ञातीबांधवांचा सर्व स्तरांवर विकास घडवून आणण्यासाठी आपल्या ज्ञातीसंस्थेची संस्थापना प्रथम १८९० ते १९०० या कालखंडात “गौड ब्राह्मण सोशल क्लब” या रूपाने केली.
पुढे काही वर्षे कार्य केल्यानंतर सन १८९७ साली या संस्थेचे “गौड ब्राह्मण सभा” या संस्थेत रुपांतर झाले. ती ही आपणा सर्वांच्या हक्काची “गौड ब्राह्मण सभा”!
गौड ब्राह्मण सभेचे आद्य संस्थापक म्हणून कै.श्री.बाबाजी अनंत प्रभू उर्फ काकासाहेब तेंडोलकर आणि कै.श्री.शंकरराव महादेव मतकरी यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात. समाजऐक्याची नवीन व अभिनव दृष्टी प्राप्त करून देण्यासाठी १८९७ साली गौड ब्राह्मण सभा गिरगाव येथे अवतरली. तेव्हापासून तिने सहकार्याच्या विचारसरणीचा पुरस्कार करून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीस हातभार लावला आहे. ज्ञातीहिताच्या रक्षणाचे व समाजसेवेचे व्रत स्वीकारून सभेने काही निश्चित ध्येयं-धोरणे आखलीव त्यानुसार विविध उपक्रमदेखील सुरू केले.
गौड ब्राह्मण समाजामध्ये परस्पर स्नेहभावना व बंधुभाव वाढीस लागून समाजास व्यवस्थित व सुसंघटित स्वरूप प्राप्त व्हावे, समाजातील लोकांना परस्परांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा आणि प्रेमयुक्त सहानुभूतीचा फायदा वाढत्या प्रमाणात घेता यावा; तसेच गौड ब्राह्मण समाजातील ज्ञातीबांधवांच्या अंगभूत कलागुणांना वाव देऊन उचित सन्मान करणे, ज्ञातीतील धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्य, औद्योगिक, सामाजिक, क्रीडा आदि क्षेत्रांतील कर्तबगार, निपुण, मान्यवर व्यक्तींचा सन्मान करणे, सभा-संमेलने भरवणे, वधू-वर पालक मेळावा तसेच सामुदायिक मौजीबंधन सोहळा आयोजित करणे, क्रीडामहोत्सवाचे आयोजन करणे, ज्ञातीतील ७० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या निराश्रित स्त्री/पुरुषांना तसेच कर्करोगग्रस्त व अन्य व्याधीग्रस्त रुग्णांना आर्थिक साहाय्य करणे, ज्ञातीतील गुणवंत, होतकरू परंतु गरीब, गरजू मुलांना शिष्यवृत्ती देणे, सभेचे मुखपत्र “गौड ब्राह्मण” हे त्रैमासिक नियमित प्रकाशित करणे ही या संस्थेची प्रमुख ध्येयं आणि उद्दिष्टे आहेत.