कुडाळदेशकर गौड ब्राह्मण प्रीमियर लीग क्रीडामहोत्सव (KPL)

१२ जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंदांची जयंती तसेच राष्ट्रीय युवादिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून गौड ब्राह्मण ज्ञातीतील युवा पिढीने कलाक्रीडेच्या माध्यमातूनदेखील एकत्र येऊन ज्ञातीच्या विकासाला हातभार लावावा या हेतूने सन २०१६ पासून गौड ब्राह्मण सभेतर्फे “कुडाळदेशकर गौड ब्राह्मण प्रीमिअर लीग” क्रीडामहोत्सवाचे (KPL) प्रयोजन केले जाते. हा ज्ञातीचा क्रीडामहोत्सव असून तो न केवळ पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी ठरला आहे तर दरवर्षी याला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षणीय आहे. आतापर्यंत KPL-२०१६ (गोरेगाव, मुंबई), KPL-२०१७ (पनवेल, नवी मुंबई) आणि KPL-२०१८ (कुडाळ, सिंधुदुर्ग), KPL-२०१९ (गोवा) आणि KPL-२०२० (डोंबिवली) चे यशस्वी आयोजन करण्यासाठी विविध ज्ञातीसंस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, इतर ज्ञातीसंस्था, हितचिंतक आणि क्रीडारसिक ज्ञातीबांधवांनी मोलाचा हातभार लावला आहे. यापुढेही असेच सर्वांच्या सहकार्याने हा ज्ञातीचा वार्षिक क्रीडामहोत्सव दरवर्षी अधिकाधिक आनंदात आणि उत्साहात साजरा होईल यात शंका नाही.
गेली तीन वर्षे आयोजित केलेल्या या क्रीडामहोत्सवाचा (KPL) तपशील खालीलप्रमाणे आहे –

कुडाळदेशकर गौड ब्राह्मण प्रीमियर लीग क्रीडामहोत्सव (KPL):– २०२०

(दिनांक: ११ जानेवारी ते १२ जानेवारी २०२०, स्थळ: डोंबिवली जिमखाना ग्राउंड, डोंबिवली)
१२ जानेवारी हा दिवस ‘स्वामी विवेकानंद जयंती’ तसेच ‘राष्ट्रीय युवादिन’ म्हणून देशात सर्वत्र साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून ‘गौड ब्राह्मण ज्ञातीतील युवापिढीने कला-क्रीडेच्या माध्यमातूनदेखील एकत्र येऊन ज्ञातीच्या विकासाला हातभार लावावा’ ह्या हेतूने सन २०१६ पासून गौड ब्राह्मण सभेतर्फे “कुडाळदेशकर गौड ब्राह्मण प्रीमियर लीग” क्रीडामहोत्सवाची संकल्पना राबवली जाते.
यंदा ‘गौड ब्राह्मण सभा’ संकल्पित, ‘कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली’ या संस्थेतर्फे आयोजित पाचव्या ‘कुडाळदेशकर प्रीमियर लीग” क्रीडामहोत्सवाचे (२०२०) आयोजन दि. ११, १२ जानेवारी २०२० रोजी डोंबिवली येथील जिमखाना ग्राउंडवर करण्यात आले होते. या क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन भारताची आंतरराष्ट्रीय माजी कसोटीवीर, कोच श्रीम. सुलक्षणा नाईक व ज्ञातीतील उद्योजक श्री. गणेश सामंत यांच्या हस्ते पार पडले.
पुरुषांच्या क्रिकेट सामन्यात सावंतवाडी संघ विजेता ठरला. तर महिला गटात अव्वल आला, हे विशेष! या स्पर्धेत क्रिकेट, टेबलटेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम ह्या खेळांचा समावेश करण्यात आला होता. या क्रीडामहोत्सवात एकुण २१ पुरुष क्रिकेट टीम आणि ५ महिला क्रिकेट टीमसह इतर खेळांसाठीदेखील बहुसंख्य स्पर्धकांनी भाग घेतला होता.
सदर क्रीडामहोत्सवाच्या आयोजनासाठी कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग या संस्थेचे अध्यक्ष श्री. राजाभाऊ पाटकर, उपाध्यक्ष श्री विनय तिरोडकर, कार्याध्यक्ष श्री गणेश देसाई, विश्वस्त श्री न. ना. पंतवालावलकर, गौड ब्राह्मण सभेचे पदाधिकारी श्री. मनीष दाभोलकर तसेच श्रीम. दर्शना सामंत, adv. रघुनाथ देसाई, सेंट जोसेफचे श्री. राजू शिंदे आणि सहयोग संस्थेच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. क्रीडामहोत्सवाच्या बक्षीस समारंभास क्रीडासंघटक श्री. केशव सामंत व क्रिकेट प्रशिक्षक श्री. राजन धोत्रे यांची विशेष उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाची काही क्षणचित्रे वेबसाईटच्या Gallery – Events Gallery या मेन्यूमध्ये पाहता येतील.

Click Here to View →

कुडाळदेशकर गौड ब्राह्मण प्रीमियर लीग क्रीडामहोत्सव (KPL) – २०१९

(दिनांक: १८ जानेवारी ते २० जानेवारी २०१९, स्थळ: लोहिया क्रिडा संकुल, फोंडा, गोवा.)
आपल्या कुडाळदेशकर गौड ब्राह्मण ज्ञातीतील अबाल-वृद्धांमध्ये जिव्हाळ्याचा असलेला ‘KPL’ अर्थात “कुडाळदेशकर गौड ब्राह्मण प्रीमियर लीग”चा यंदाचा क्रीडामहोत्सव दि. १८ जानेवारी ते २० जानेवारी २०१९ या कालावधीत गोव्याच्या फोंडा येथील लोहिया क्रीडासंकुलात अत्यंत जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
ह्या KPL क्रीडामहोत्सवात क्रिकेट विभागात पुरुष गटातील १६ व महिला गटातील ५ असे एकूण २१ संघ सहभागी झाले होते. मुंबई, गोवा, कोकण व्यतिरिक्त बेळगाव, मंगलोर आदि भागातील संघ सहभागी झाले होते.

लीग पद्धतीने खेळवल्या गेलेल्या मर्यादित षटकांच्या या सामन्यांचा निकाल खालीलप्रमाणे होता –
विजेता संघ - गोवा संघ १,
उपविजेता संघ - वेंगुर्ला संघ – १

गतवर्षीपासून सुरु झालेल्या महिला क्रिकेट सामन्यांचा यंदाचा निकाल असा होता -
विजेता संघ - सखी संघ, पनवेल,
उपविजेता संघ - सहेली संघ, गोवा

क्रिकेट सामन्यांच्या बरोबरीने यंदा बॅडमिंटन व टेबल टेनिसचे सामनेदेखील खेळवले गेले. या सामन्यांचा निकाल खालीलप्रमाणे होता –
बॅडमिंटन (पुरुष संघ)
विजेते : दर्शन पाटकर, विजय सामंत
उपविजेते : संदिप ठाकूर, आमोद आजगावकर

बॅडमिंटन (महिला संघ)
विजेते : सोनल गौरव तेंडुलकर, सुदिती तेंडुलकर

या सोहळ्यास संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी, इतर ज्ञातीसंस्थांचे पदाधिकारी, हितचिंतक तसेच गोवा, मंगलोर, उडुपी, बेळगाव, फोंडा, पुणे, कणकवली, हरकूळ, नेरूळ, कुडाळ, मुंबई, विरार, वसई, ठाणे, डोंबिवली, पनवेल आदि भागातून क्रीडारसिक आवर्जून उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाची काही क्षणचित्रे वेबसाईटच्या Gallery – Events Gallery या मेन्यूमध्ये पाहता येतील.

Click Here to View →

कु. दे. गौ. ब्रा. प्रीमिअर लीग (KPL) क्रीडामहोत्सव - २०१८

(दिनांक: १० व ११ जानेवारी २०१८, स्थळ: कुडाळ हायस्कूल पटांगण, कुडाळ, सिंधुदूर्ग.)
राष्ट्रीय युवादिन तसेच स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून सुरू झालेल्या कु. दे. गौ. ब्रा. प्रीमिअर लीग (KPL) चे सन २०१८ हे ३ रे वर्ष! या वर्षी सदर क्रीडामहोत्सवाचे आयोजन कुडाळ येथील “’कुडाळदेशकर गौड ब्राह्मण युवा प्रतिष्ठान, कुडाळ” या ज्ञातीसंस्थेने केले होते हे विशेष!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक चतुरस्त्र युवा व्यक्तिमत्व तसेच व्यावसायिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील आघाडीचे क्रियाशील कार्यकर्ते आदरणीय श्री. रणजित देसाई (B.Sc. L.L.B) ह्यांच्या विशेष पुढाकाराने आणि कुशल मार्गदर्शनाखाली दि. १०/२/२०१८ ते ११/२/२०१८ या कालावधीत कुडाळ हायस्कूल पटांगणात ज्ञातीतील मान्यवरांच्या उपस्थितीत क्रीडामहोत्सव संपन्न झाला.
KPL-२०१८ च्या नियोजनाची पूर्ण जबाबदारी अर्थातच गौड ब्राह्मण सभेने स्वीकारली होती. या क्रीडामहोत्सवात क्रिकेटच्या सामन्यांसोबत कॅरम स्पर्धेचेदेखील विशेष आयोजन करण्यात आले. क्रिकेटसाठी १६+२ पुरुष संघ, २ महिला संघ तसेच कॅरम स्पर्धेसाठी १४० खेळाडूंनी सहभाग घेतला. सदर क्रीडामहोत्सवात असंख्य ज्ञातिबांधव, ज्ञातीसंस्थांचे पदाधिकारी, पत्रकार, ज्येष्ठ मार्गदर्शक, विश्वस्त, प्रमुख पाहुणे आदि मान्यवरांनी जातीने उपस्थित राहून खेळाचा मनसोक्त आनंद लुटला आणि खेळाडूंना भरभरून प्रोत्साहन दिले.
महिला क्रिकेट सामन्यांची सुरुवात कुडाळ येथील KPL-२०१८ ने सुरुवात झाली, हे विशेष!
सदर कार्यक्रमाची काही क्षणचित्रे वेबसाईटच्या Gallery – Events Gallery या मेन्यूमध्ये पाहता येतील.

Click Here to View →